
प्रतिनिधी आर्वी -:

दिनांक 6 जानेवारी 2026
आर्वी:- आपल्या लेखणीच्या माध्यमातून हजारो लोकांची मन जिंकणारे,गेल्या 19 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये लौकिक प्राप्त केलेले,पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नामांकित असलेले गोल्ड मेडॅलिस्ट पत्रकार अमोल सोटे यांना पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

पत्रकारिता क्षेत्रात मास्टर ऑफ मास्क कम्युनिकेशन जर्नालिझम(MJMC) ही पदवी प्राप्त केली. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून जनसंवाद विभागातून प्रथम आले असून त्यांना गोल्ड मेडल मिळाले आहे.पत्रकार अमोल सोटे यांनी सन 2006 पासून आष्टी तालुक्यातून पत्रकारितेचे काम सुरू केले.ते लोकमतचे आष्टी (शहीद) तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. गेल्या 19 वर्षात एकाच पेपरमध्ये राहून अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे आणि अविरत सुरू आहे. समाजातील गोर-गरीब,दिन-दलित, सर्व घटकांना सातत्याने लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य त्यांच्या हातून अविरत सुरू आहे. कुठल्याही समस्येला वाचा फोडायची हे त्यांनी ठरविल्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचे काम सुद्धा त्यांनी शेकडो प्रकरणात केल्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. अमोल सोटे यांनी अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून जीवनाचा प्रवास सुरू केला.आष्टी येथे सुरुवातीला तीन वर्ष हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये सन 1998 ते 2000 साली शिक्षण घेतले.त्यानंतर आई वडिलांच्या आशीर्वादाने व सहकार्याने घरगुती भोजनालय सुरू केले. सन 2000 ते 2014 अशी सलग चौदा वर्ष सोटे परिवाराने भोजनालय चालविले.आई वडील यांचे अफाट कष्ट आणि मार्गदर्शन तर बहीण भाऊ यांची सदैव चागलीच सकारात्मक साथ त्यांना मिळाली. त्यानंतर सन 2014 साली त्यांनी भोजनालय बंद केले. नवीन व्यवसाय म्हणून शासकीय ठेकेदारी सुरू केली. ठेकेदारीच्या माध्यमातून असंख्य चांगल्या दर्जाची कामे त्यांच्या हातून पार पडत आहे. कुठल्याही सामाजिक, शैक्षणिक धार्मिक व आरोग्य विषयक कार्याला मदत करण्याचा त्यांचा छंद आजही त्यांनी जोपासून ठेवला आहे. स्वतःच्या नावाची कुठेही प्रसिद्धी न करता ते अनेकांना आर्थिक मदत करतात. विशेषता शिक्षण व आरोग्य सेवेमध्ये त्यांनी अनेकांना आर्थिक मदत केली.मात्र मदतीचा गाजावाजा कधीही केला नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने ते जीवनाची वाटचाल अतिशय चांगल्या मार्गाने करीत आहे. निर्व्यसनी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सदैव आदर्श पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कायम आहे. पत्रकार कसा असावा याचे मूर्तीवंत उदाहरण त्यांच्या कार्यातून सदोदित पाहायला मिळते.याच त्यांच्या कार्याची दखल घेवून पत्रकार संरक्षण समिती वर्धा जिल्ह्याच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आर्वी येथे आयोजित पत्रकार पुरस्कार सोहळ्यामध्ये अमोल सोटे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे,पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे,अमरावती येथील दंत रोग तज्ञ डॉ.सय्यद अबरार सर यांच्या हस्ते मिळाला.यावेळी विधानपरिषद आमदार दादाराव केचे,उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी चंद्रकांत ढोले,तहसीलदार आर्वी हरीश काळे,पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष रामजी खुर्दळ,शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल,डॉ.रिपल राणे,पत्रकार संरक्षण समितीचे वर्धा जिल्हाध्यक्ष शशांक चतारे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संदीप रघाटाटे,विदर्भ उपाध्यक्ष रविराज घुमे,जिल्हा कार्याध्यक्ष शेख सत्तार,जिल्हा सचिव योगेश कांबळे यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते. अमोल सोटे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे दैनिक लोकमतचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र चांदेकर,दैनिक साहसिकचे संपादक रवींद्रभाऊ कोटंबकर,दैनिक महासागर चे जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र देशमुख, दैनिक राजरंगचे संपादक राजूभाऊ गोरडे, जिल्हा प्रतिनिधी जितुभाऊ गोरडे,विदर्भ पत्रिकेचे संपादक राजूभाऊ डोंगरे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण करोले,आष्टी तालुका पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजी चंदिवाले,राष्ट्रीय कीर्तनकार तथा पत्रकार गजानन भोरे महाराज यांच्यासह सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले.




