HomeUncategorizedविकासाचा नवा सुर्योदय वर्धा जिल्ह्यातील 58 पारधी वस्त्यांमध्ये पेटली शिक्षण क्रांतीची मशाल...!!

विकासाचा नवा सुर्योदय वर्धा जिल्ह्यातील 58 पारधी वस्त्यांमध्ये पेटली शिक्षण क्रांतीची मशाल…!!

⚫ विकासाचा नवा सूर्योदय: वर्ध्याच्या ५८ पारधी वस्त्यांमध्ये पेटली शिक्षणाची मशाल!

📰 पारधी समाजाच्या वेदनांना आवाज; ‘क्रांतिवीर समशेर सिंह पारधी शिक्षण जागर यात्रा’चा वर्ध्यात भावनिक समारोप.

प्रतिनिधी वर्धा

दिनांक 12 मार्च 2026

वर्धा : आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त श्रीमती आयुषीसिंह यांच्या मार्गदर्शनात व आदिवासी विकास विभाग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या न्याय, हक्क, शिक्षण आणि सन्मानाच्या लढ्याला नवी दिशा देणाऱ्या ‘क्रांतिवीर समशेर सिंह पारधी शिक्षण जागर यात्रे’चा समारोपीय सोहळा शेकडो आदिवासी पारधी समाजाबांधवांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नागपूर आयुषी सिंह होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त, आदिवासी विकास विभाग नागपूर डिगंबर चव्हाण उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा गीतांजली निकम उपस्थित होत्या. तर मुख्य मार्गदर्शन आदिवासी सेवक महाराष्ट्र राज्य बबन डी. गोरामण यांनी केले.

   या प्रसंगी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांच्या शुभहस्ते मांडवगड परिसरातील आदिवासी पारधी बेड्याचे “हंसापूर” असे नामकरण करत फलकाचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजाला नवी ओळख आणि सन्मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बबनजी गोरामण यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुक्तीनगर पारधी वस्तीतून सुरू झालेल्या क्रांतिवीर समशेर सिंह पारधी शिक्षण जागर यात्रेचा संपूर्ण प्रवास उलगडून सांगितला. यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यातील अनेक पारधी वस्त्यांवर भेट देताना समाजाची अत्यंत विदारक परिस्थिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणापासून वंचित राहणारी मुले, शासकीय कागदपत्रांचा अभाव, अतिक्रमित जमिनींचे प्रश्न, बालविवाह आणि बेरोजगारी यामुळे समाजाचे जीवन अजूनही संघर्षमय असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात आयुषी सिंह यांनी आदिवासी विकास विभाग पारधी वस्त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आदिवासी पारधी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 यावेळी मार्गदर्शन करताना गीतांजली निकम यांनी सांगितले की, उपविभागीय अधिकारी आणि सर्व तहसीलदार यांच्या समन्वयातून प्रत्येक पारधी वस्तीत विशेष राजस्व अभियान राबविण्यात येईल. या माध्यमातून आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड यांसारखे आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजनांचा लाभ सर्व पारधी समाज बांधवांना मिळावा यासाठी विभाग त्यांच्या सोबत राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. पारधी वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

 समारोपीय कार्यक्रमात पारधी समाजातील महिलांनी आपल्या वेदना अत्यंत हळव्या शब्दांत मांडल्या. बालविवाहामुळे समाजाचे होणारे नुकसान, वस्त्यांना जोडणारे रस्ते नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणारी मुले, उपजीविकेची साधने नसल्यामुळे वाढलेली बेरोजगारी आणि त्यातून पारंपरिक शिकारी किंवा दारू गाळण्यासारख्या कामांकडे वळण्याची वेळ येते, असे त्यांनी सांगितले. परिणामी पोलीस प्रशासनाकडून होणारी अमानुष पिळवणूक, महिलांवर अनेक गुन्हे दाखल होणे, आधारकार्ड घेऊन जबरदस्तीने खोटे गुन्हे दाखल केल्याच्या तक्रारीही त्यांनी मांडल्या. या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना वारंवार स्थलांतर करावे लागते आणि त्यामुळे मुलांचे शिक्षण खंडित होते, असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

 या समारोपीय सोहळ्यातून पारधी समाजाच्या वेदना आणि प्रश्न शासनापर्यंत पोहोचले असून समाजाला न्याय, हक्क, सामाजिक सन्मान आणि संविधानिक अधिकार मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. “शस्त्राकडून शास्त्राकडे” या संकल्पनेतून शिक्षणाच्या माध्यमातून पारधी समाजात नवी पहाट उगवेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

वर्धा जिल्ह्यात ‘क्रांतिवीर समशेरसिंह पारधी शिक्षण जागर यात्रा’ यशस्वीपणे राबविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी माननीय आकाशजी अवतारे साहेब, आर्वी चे उपविभागीय अधिकारी माननीय विश्वास शिरसाट साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. सोबत सामाजिक बांधिलकी जोपसणारे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, आर्वी, आष्टी, समुद्रपूर, देवळी, कारंजा घाडगे, सेलू व वर्धा येथील तहसीलदार साहेबांचे देखील विशेष सहकार्यातून शिक्षण जागर यात्रा या सामाजिक परिवर्तनाचा रथ ओढण्यास सहकार्य लाभले.

क्रांतिवीर समशेर सिंह पारधी शिक्षण जागर यात्रेचे नेतृत्व आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन बबनजी गोरामण व आदिवासी पारधी समाजाचे युवा नेतृत्व अनिलदादा पवार यांनी केले. यांच्या सोबतीला अतिश पवार, राहुल राजपूत, शिवसाजन राजपूत, नीरज माहुरे, अजय पवार, विनय गोरामण, करण गोरामण, धर्मराज भोसले, हिंदुराज भोसले, आबिचन पवार व प्रशांत गोरामण यांचे विशेष योगदान लाभले.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
26.4 ° C
26.4 °
26.4 °
27 %
1kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
41 °

Most Popular